शनिवार, १६ मे, २०१५

ब्लॉग प्रपंच कशासाठी

लग्न झाल्यानंतर साधारण चार-पाच महिन्यांच्या आतच मला दिवस गेले. त्याबद्दल जसंजसं जवळपासच्या लांबच्या लोकांना कळू लागलं तशी प्रश्नांची सरबत्ती, अनाहूत सल्ले सुरू झाले. आमचं आंतरधर्मीय लग्न असल्याने तसं होणारचं होतं, असं असिफचं म्हणणं. बरं सल्ले तरी कसे... घाई केलात नाही. अजूनही वेळ आहे... ऍबॉर्शन करू शकतेस. लग्न टिकणारेय का तुमचं? मुस्लिम मुलाबरोबर लग्न केलंएस, बघ बाबा... जमतंय का... नाहीतर वर्ष सहा महिन्यांतच माहेरचा रस्ता धरशील. माहेरचे ताठ आहेत न ग तुझे.  बरं मग तुझ्या मुलाचा/मुलीचा धर्म कोणता?

प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न... या प्रश्नांमधून डोकं वर काढून आम्हाला (आसिफला आणि मला) पहिले काही महिने आमच्या बाळाच्या येण्याचं कोडकौतुक असं काही करताचं आलं नाही. खरं तर आमचं लग्न आणि पुढच्या सार्या गोष्टी अगदी आमच्या मुलांपर्यंतच्या आम्ही ठरवून टाकल्या होत्या. काही गोष्टींसाठी पर्याय शोधले होते. पण तरीही या प्रश्नामुळे मी पॅनिक व्हायचे. अासिफ शांतच असायचा. त्याचं एकच उत्तर असायचं, आपण पूर्वीचं ठरवलंय  सगळं. त्यात बदल होणार नाहीत.  माझं समाधान व्हायचं नाही. त्यामुळे सुरूवातीचा काळ अासिफशी वाद घालण्यातच जास्त गेला. 

या गोंधळामध्ये मी आणि माझं बाळ एकत्र असूनही एकत्र नव्हतो... ते येत असल्याची प्रत्येक चाहूल तो अनुभव पुन्हा एकदा  जगता यावा, ते निसटलेले क्षण पुन्हा अनुभवता यावे, शिवाय आम्हाला आलेले अनुभव आमच्यासारख्याच इतर  आई - बाबांबरोबर शेअर करता यावा यासाठीच ब्लॉगचा खटाटोप.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा